पुढील तीन दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता; ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरातून शेतकऱ्यांना दिलासा.
विशेष प्रतिनिधी, ओझर (जि. पुणे):
सततच्या पावसाने हैराण झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक अत्यंत दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. १ नोव्हेंबर रोजी ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरात दर्शनासाठी आले असता, त्यांनी स्थानिक शेतकरी आणि भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात पावसाचा जोर आता कमी होणार असून, ७ नोव्हेंबरपासून थंडीला सुरुवात होईल, असे स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्याने काढणीला आलेली पिके आणि रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. हा पाऊस कधी थांबणार, या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना डख यांच्या अंदाजाने मोठा दिलासा मिळाला आहे. ओझर येथे दर्शनासाठी आले असता, त्यांना पाहताच स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाबाबत विचारणा केली.
यावेळी माहिती देताना पंजाबराव डख म्हणाले, “राज्यात पुढील तीन दिवस, म्हणजेच १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान, भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र, या पावसाचा जोर मोठा नसेल आणि तो सर्वत्र पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.”
शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देताना ते पुढे म्हणाले, “हा पावसाचा शेवटचा टप्पा असेल. ७ नोव्हेंबरपासून राज्यातून पाऊस पूर्णपणे निघून जाईल आणि सर्वत्र थंडीची चाहूल लागेल. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या सर्वच भागांत हवामान कोरडे होऊन हिवाळ्याला सुरुवात होईल.”
अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या ओझरच्या विघ्नहर गणपतीच्या दर्शनानंतर त्यांनी हा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या मार्गातील पावसाचे ‘विघ्न’ आता दूर होईल, अशी आशा अनेकांनी व्यक्त केली. या अंदाजामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या कामांना आता वेग येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.