पुढील ३ दिवस तुरळक सरी, ७ नोव्हेंबरनंतर राज्यात थंडीची लाट; ऊसतोडणी आणि रब्बी पेरणीचा मार्ग मोकळा होणार.
विशेष प्रतिनिधी, पुणे:
सततच्या परतीच्या पावसाने हैराण झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी अत्यंत दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. राज्यात ७ नोव्हेंबरपासून पाऊस पूर्णपणे निघून जाईल आणि कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जुन्नर तालुक्यातील ओझर येथे श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी आले असता, त्यांनी आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला.
सध्या राज्यात ऊसतोडणीचा हंगाम सुरू झाला असून, अनेक भागांत सोयाबीन, भाजीपाला आणि इतर पिकांची काढणी सुरू आहे. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतीच्या कामांमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आज आमदार अतुल बेनके यांच्यासोबत ओझर येथे आले असता, स्थानिक शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन पावसाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. पाऊस कधी थांबणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला.
यावर बोलताना डख यांनी शेतकऱ्यांना घाबरून न जाण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “राज्यात पुढील दोन-तीन दिवस, म्हणजेच ४ नोव्हेंबरपर्यंत तुरळक आणि भाग बदलत पाऊस पडेल. हा पाऊस मुसळधार किंवा सर्वदूर नसेल, त्यामुळे मोठा धोका नाही.”
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा देताना ते पुढे म्हणाले, “हा पावसाचा शेवटचा टप्पा आहे. ७ नोव्हेंबरपासून राज्यातील पावसाळी वातावरण पूर्णपणे निवळेल. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि खान्देश या सर्वच भागांतून पाऊस निघून जाईल आणि थंडीची जोरदार सुरुवात होईल,” असा स्पष्ट अंदाज डख यांनी वर्तवला.
या अंदाजामुळे ऊसतोडणी आणि रब्बी हंगामाच्या पेरणीच्या नियोजनात अडथळे आलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ७ नोव्हेंबरनंतर शेतीच्या कामांना वेग येईल, अशी आशा निर्माण झाली आहे.