१९ किलोच्या सिलिंडरमागे ५ रुपयांपर्यंतची कपात; घरगुती गॅस दरात कोणताही बदल नाही.
विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली:
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील बदलांमुळे ही घट झाली असून, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाकडे पाहिले जात आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी नाही, कारण १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
तेल कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात ५ रुपयांपर्यंतची कपात केली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या दरवाढीनंतर ही घट आल्याने व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
प्रमुख शहरांमधील नवे दर:
-
दिल्ली: राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर ५ रुपयांनी स्वस्त झाला असून, त्याचा नवा दर १,५९०.५० रुपये असेल.
-
मुंबई: आर्थिक राजधानी मुंबईतही ५ रुपयांची कपात झाल्याने सिलिंडरची किंमत आता १,५४२ रुपये झाली आहे.
-
कोलकाता: येथे दरात ४.५० रुपयांची घट झाली असून, नवा दर १,६९४ रुपये आहे.
-
चेन्नई: चेन्नईमध्येही ४.५० रुपयांची कपात करण्यात आली असून, सिलिंडर आता १,७५० रुपयांना मिळेल.
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १५.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता झालेली ही किरकोळ कपात बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला निर्णय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, घरगुती गॅसच्या दरात सलग पाचव्या महिन्यात कोणताही बदल न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना दरवाढीच्या धक्क्यातून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.